ताज्या बातम्या

मागण्या मान्य न झाल्यास १ जुलैला आझाद मैदानात आत्मदहनाचा इशारा; मांग गारुडी समाज आक्रमक

मुंबई : सरकारकडे शेकडो निवेदने देऊन तसेच वारंवार आंदोलने करूनही मांग गारुडी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा आरोप करत, ३० जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात आत्मदहन करण्याचा इशारा मांग गारुडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेली तरी मांग गारुडी समाजावर अन्याय कायम असून, समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. अनेक वर्षांपासून विविध मागण्या शासनाकडे मांडल्या जात आहेत, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, अनेकजण निधन पावले, तरीही शासनाने समाजाच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देणे हा शेवटचा पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मांग गारुडी समाजाच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करणे, मुंबईत स्वतंत्र समाजभवन उभारणे, समाजाच्या विकासासाठी अभ्यास आयोग नेमणे, तसेच समाजाचे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी विधान परिषदेवर प्रतिनिधी नियुक्त करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय राज्यातील बेघर कुटुंबांसाठी ५० हजार घरकुले मंजूर करावीत, मागासवर्गीय शासकीय कार्यालयांमध्ये समाजातील सुशिक्षित युवकांना विशेष प्राधान्याने रोजगार द्यावा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, जात दाखल्यांमधील जाचक अटी रद्द करून संघटनांच्या शिफारशीवर जात प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, तसेच समाजकल्याण योजनेंतर्गत मांग गारुडी समाजातील उद्योजकांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
तसेच, मांग गारुडी समाजाला मातंग समाजाच्या पोटजातीमधून वगळून स्वतंत्र जातीचा दर्जा देण्यात यावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
सरकारने ३० जूनपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा १ जुलै रोजी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अमर कसबे यांनी दिला.

Scroll to Top