ताज्या बातम्या

रायगडाचे चिरे नव्हे, ‘शिवविचार’ हृदयात कोरून न्या! – ‘शिवसूर्य सह्याद्री’चा रायगडावर धगधगता जागर; आईसाहेब संयोगिता राजे यांच्याकडून सुवर्ण होन देत गौरव

रायगड(ओमकार धुळप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांची उपस्थिती लाभली असताना, गडाचे पावित्र्य, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ‘शिवसूर्य सह्याद्री’ संस्थेने राबवलेल्या उपक्रमांची विशेष दखल घेतली जात आहे. या कार्याची प्रशंसा करत आईसाहेब संयोगिता राजे यांनी संस्थेचे कार्यकर्ते प्रज्योत मुळे यांचा सुवर्ण होन देऊन गौरव केला.

रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि शिवप्रेमींच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखो शिवभक्त गडावर दाखल होतात. अशा वेळी गर्दीचे व्यवस्थापन, गडाचे संरक्षण आणि शिवभक्तांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘शिवसूर्य सह्याद्री’ परिवाराकडून करण्यात येते.

संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते प्रज्योत मुळे यांनी सांगितले की, शिवभक्तांनी रायगडाकडे पर्यटनस्थळ म्हणून नव्हे तर ‘शिवतीर्थ’ म्हणून पाहिले पाहिजे. गडाचे संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

गडावरील अतिउत्साहामुळे ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्यात आली. विशेषतः टकमक टोक, भवानी कडा आणि तटबंदी परिसरात सतत लक्ष ठेवून पर्यटकांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या. गर्दीमध्ये निर्माण होणारे किरकोळ वादही स्वयंसेवकांनी संयमाने आणि ‘जय शिवराय’च्या घोषणेद्वारे शांत केल्याचे पाहायला मिळाले.

यावर्षी संस्थेने ‘शिवबीज’ हा अभिनव उपक्रम राबवत सुमारे १० हजार बियांचे वाटप केले. शिवभक्तांनी गडावरील दगड किंवा माती स्मृतिचिन्ह म्हणून नेण्याऐवजी वड, पिंपळ आणि फळझाडांच्या बिया घेऊन जाऊन वृक्षसंवर्धन करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

तसेच ‘माझा गड, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ५ हजार जनजागृती बॅजचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त रायगड घडविण्यासाठी शिवभक्तांनी स्वतःचा कचरा परत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रज्योत मुळे यांनी सर्व शिवप्रेमींना संदेश देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ घोषणांमध्ये नसून त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या जीवनात उतरवणे आवश्यक आहे. गडाचे पावित्र्य जपा, व्यसनांपासून दूर रहा, निसर्गाचे संवर्धन करा आणि शिवरायांचे वैचारिक वारसदार बना, असे आवाहन त्यांनी केले.

रायगड संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शिवविचारांची जनजागृती या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या ‘शिवसूर्य सह्याद्री’च्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Scroll to Top