मुंबई(६ जून) : दादर, माहीम आणि माटुंगा परिसरात गेल्या महिनाभरापासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच काही भागांत गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या तथा माजी नगरसेविका विशाखा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने वरळी येथील जलअभियंता कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
दादरमधील एल. जे. रोड, गोखले रोड, वीर सावरकर मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, भवानी शंकर रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, भाऊची गल्ली, प्रभादेवी तसेच जोगेश्वरी वाडी, कवळीवाडी, गोपाळ भुवन वाडी, दत्ता राऊळ मार्ग आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये अत्यल्प दाबाने पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी तळमजल्यापासून ते वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा होत असला तरी कमी दाबामुळे प्रत्यक्षात घरांमध्ये पाणी पोहोचण्यास उशीर होत आहे. काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजताच्या पुरवठ्याचे पाणी नागरिकांच्या घरात रात्री ८ वाजल्यानंतर येत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.
याशिवाय काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरातील काही इमारतींना गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. एकीकडे पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे दूषित पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सतत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत शिवसेना शाखेमार्फत नागरिकांचे शिष्टमंडळ वरळी हब कार्यालयात गेले. यावेळी हायड्रॉलिक इंजिनिअर दिलीप पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. परिसरातील वस्तुस्थितीची माहिती देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीनंतर दिलीप पाटील यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या कालावधीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महिलांचा भव्य हंडामोर्चा महानगरपालिकेच्या कार्यालयावर नेण्यात येईल, असा इशारा शिवसेना शाखाप्रमुख अजित कदम आणि माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांनी दिला.
या वेळी विधानसभा संघटक आरती किनरे, शाखासंघटक दीपाली साने, विजय नागवेकर, किशोर पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी, उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने आणि शुद्ध पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून प्रशासनाने या समस्येचे तातडीने निराकरण करावे,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




