नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. (डी. बी.) पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली.
अवघ्या आठ महिन्यांत साकारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा विमानतळ परिसराचे प्रमुख आकर्षण ठरणार असून महाराष्ट्राच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख जगासमोर करून देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. आधुनिक विकासासोबत राज्याचा गौरवशाली इतिहास जपणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शिवरायांचे विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असेही नमूद केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत राज्य सरकार ठाम असून त्यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. लवकरच अंतिम मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दि. बा. पाटील यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यामुळे त्यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण करण्याची अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.




