मुंबई(रत्नकांत सावंत) :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग आणि रूर ग्रीन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत माहीम येथील बाजी प्रभू उद्यानात टेट्रा पॅकपासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणस्नेही टाईल्सची पायवाट उभारण्यात आली.
दुकाने, शॉपिंग मॉल, स्मार्ट बाजार तसेच गृहनिर्माण संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या टेट्रा पॅकवर वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे प्रक्रिया करून या टाईल्सची निर्मिती करण्यात आली आहे. ‘वेस्ट टू इन्फ्रास्ट्रक्चर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत रूर ग्रीन लाईफ संस्था अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे.
या कार्यक्रमात टेट्रा पॅकपासून तयार करण्यात आलेल्या विविध घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना प्लास्टिकमुक्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जी उत्तर विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत रूर ग्रीन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे स्वागत केले. याशिवाय पुण्यनगरी, युनायटेड वे आणि संगम प्रतिष्ठान या संस्थांनी चैत्यभूमी समुद्रकिनारा आणि माहीम रेतीबंदर परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या सर्व कार्यक्रमांना सन्मा. अमित ठाकरे तसेच जी उत्तर विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची विशेष उपस्थिती लाभली. पर्यावरण संरक्षणासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असा संदेश या उपक्रमांमधून देण्यात आला




