मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेच्या वतीने आयोजित सिनियर, ज्युनियर, सब-ज्युनियर, मास्टर्स पुरुष व महिला तसेच अंध व गतिमंद दिव्यांगांच्या राज्यस्तरीय इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच मुंबईतील वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन नागरी सेवा विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने करण्यात आले होते. स्पर्धेचे यशस्वी नियोजन व संचालन सचिव संजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पॉवरलिफ्टर सतीश सुनंदा मुरलीधर पाताडे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ‘मास्टर्स-3 स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा किताब पटकावला. विशेष म्हणजे, दुखापत असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर सुवर्णपदकासह हा बहुमान मिळवून आपल्या कर्तृत्वाची पुन्हा एकदा छाप उमटवली.
सेवानिवृत्त मंत्रालयीन अधिकारी असलेल्या श्री. पाताडे यांनी आतापर्यंत देशाचे प्रतिनिधित्व करत 9 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 19 पदके जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीत 20 हून अधिक वेळा ‘स्ट्राँग मॅन’ किताब पटकावण्याचा मान मिळवला आहे.
या यशामागे त्यांचे मार्गदर्शक व प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते अनंत चाळके सर यांचे मोलाचे योगदान असल्याचे श्री. पाताडे यांनी सांगितले. युनायटेड क्लब, ठाणेचे प्रशिक्षक असलेल्या चाळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे.
श्री. सतीश पाताडे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या जिद्दीचा आदर्श नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.




