मुंबई(संतोष कदम) :

धारावी येथील शंकर कवडे चाळ, संत कक्क्या मार्ग परिसरात राहुल भरोडकर यांच्या राहत्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. घराला टाळे बंद असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत घराचा टाळा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये आगीचा भडका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसताच तात्काळ मुख्य वीजपुरवठा बंद करण्यात आला. तसेच फायर एक्स्टिंग्विशर आणि पाण्याच्या सहाय्याने नागरिकांनी जीवाची पर्वा न करता आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने गॅस सिलेंडर, फ्रिज आणि इतर ज्वलनशील वस्तू सुरक्षित बाहेर काढत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब असली तरी घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांचे धाडस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.



