कराड(भीमराव धुळप) : “आईची प्रकृती अत्यंत गंभीर आहे… लवकर या…” रात्रीच्या शांततेत आलेला हा एक फोन… आणि त्या एका क्षणात एका मुलाचे संपूर्ण जग हादरून गेले. मात्र त्याच क्षणी त्याच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी होती — तब्बल ६० प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याची.
कराड ते मुंबई सेंट्रल या मार्गावरील MH-14 MH-1683 क्रमांकाची जादा एसटी बस रात्री ८ वाजता सुटणार होती. सर्व ६० सीटचे आरक्षण पूर्ण झाले होते. काही कारणांमुळे बस अर्धा तास उशिराने, म्हणजे रात्री ८.३० वाजता कराडहून रवाना झाली. त्यामुळे प्रवासी आधीच नाराज होते.
रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास बस सातारा एसटी डेपोमध्ये पोहोचली. त्याच वेळी चालक रवींद्र भिंगार देवे यांच्या मोबाईलवर घरून फोन आला. फोनवरील शब्द ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांच्या आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
एका बाजूला आई मृत्यूशी झुंज देत होती… दुसऱ्या बाजूला ६० प्रवाशांचा विश्वास… आणि मध्ये उभा होता एक कर्तव्यदक्ष चालक…
घडलेली परिस्थिती त्यांनी तत्काळ सातारा एसटी स्थानकातील बस नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या चालकाची व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरू झाली; मात्र वेळ पुढे सरकत होता आणि कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता.
दरम्यान, बसमधील प्रवासीही अस्वस्थ होऊ लागले. अनेक जण खाली उतरले. काहींनी शांतपणे विचारणा केली — “आता पुढे काय होणार?” मात्र प्रवाशांच्या म्हणण्यानुसार त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींना उद्धट वागणूक मिळाल्याचीही भावना व्यक्त करण्यात आली.
परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की संतप्त प्रवाशांनी, “पुढील दहा मिनिटांत बस सुरू झाली नाही तर सातारा डेपोमधून एकही बस बाहेर जाऊ देणार नाही,” असा इशारा दिला. काही काळासाठी सातारा एसटी डेपो परिसरात आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले होते.
या सर्व गोंधळात चालक रवींद्र भिंगार देवे मात्र शांतपणे उभे होते. डोळ्यासमोर आईची चिंता होती, मनात अस्वस्थता होती; पण तरीही त्यांनी आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवली नाही.
अखेर त्यांनी मन कठोर करत निर्णय घेतला — “माझ्यावर या ६० प्रवाशांची जबाबदारी आहे… त्यांना सुखरूप पोहोचवणं हेच माझं कर्तव्य आहे…”
आणि पुन्हा एकदा त्यांनी स्टेअरिंग हातात घेतले.
आज अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांवर टीका केली जाते; मात्र याच व्यवस्थेमध्ये स्वतःच्या वैयक्तिक दुःखावर मात करून कर्तव्याला सर्वोच्च मानणारे कर्मचारीही आहेत, हे रवींद्र भिंगार देवे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
मी, ओमकार भीमराव धुळप, काल या बसमधून प्रवास करत होतो. ही संपूर्ण घटना माझ्या डोळ्यांसमोर घडली. त्यामुळे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एक प्रवासी आणि एक माणूस म्हणून जे पाहिले, जे अनुभवले आणि जे मनाला भिडले, ते शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न…
काही प्रसंग हे केवळ बातम्या नसतात… ते माणुसकीचा खरा चेहरा दाखवून जातात.




