कराड(प्रताप भणगे) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज कराड येथे सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि कराड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, देशातील तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांचे तब्बल ७९ पेपर फुटल्याचा दावा करत भाजपा सरकार आणि प्रशासन यालाच जबाबदार असल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर असून, युवक काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पेपरफुटी रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” अशी टीका आंदोलनादरम्यान करण्यात आली.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबणावे, प्रदेश सरचिटणीस तथा सातारा जिल्हा प्रभारी भुषण राणभरे, सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, NSUI जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, प्रदेश सरचिटणीस विश्वजीत जाधव, तालुका अध्यक्ष देवदास माने, कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, कराड उत्तर अध्यक्ष प्रवीण वेताळ, कराड तालुका अध्यक्ष नामदेवराव पाटील, पाटण अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, संजय तडाखे, दिग्विजय सूर्यवंशी, राम मोहीते, सरचिटणीस अक्षय सुर्वे, मयुर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव, शानूर देसाई, तुषार लोंढे, अतुल थोरात, महेश पवार, शाहरुख मुल्ला यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.




