
प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आणखी एक उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. काँग्रेसने आता या जागेवर वर्षा गायकवाड यांना लोकसभेचं तिकीट दिली आहे.
काँग्रेसकडून वर्षा गायकडवाड यांना उमेदवारी
मुंबईतील दोन जागावरील उमेदवार अद्यापही महाविकास आघाडीने जाहीर केलेले नव्हते, या दोन्ही जागा काँग्रेसकडे आहेत. यातील एका जागेवर काँग्रेसने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकडवाड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, अखेर वर्षा गायकवाड यांच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र, त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.
उत्तर मध्य मुंबई मतदार संघात महायुतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती आता कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे आता लक्ष लागलं आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातून मविआचा उमेदवार कधी ठरणार?
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता उमेदवारी झाल्याने वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीकडून उत्तर मुंबई मतदारसंघाच्या आणखी एका जागेवर उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. आता मुंबई उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार की, ठाकरे गटाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे.