Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूर व हातकणंगले येथील महाविकास आघाडीच्या उमेवारांना निवडून द्या - समाजवादी पार्टी

कोल्हापूर व हातकणंगले येथील महाविकास आघाडीच्या उमेवारांना निवडून द्या – समाजवादी पार्टी

प्रतिनिधी – इ. स. 2014 पासून गेली दहा वर्षे ‘केंद्रशासन’, ‘भारत सरकार’ हे शब्द गायब झाले आहेत. आणि केवळ ‘मोदी सरकार’ व ‘मोदींची गॅरंटी’ या शब्दांनी कब्जा केला आहे. ही एकाधिकारशाही व हुकूमशाही मनोवृत्तीची आणि व्यक्तीस्तोम व अंधभक्ती वाढवणारी हिटलर आणि गोबेल्स यांची प्रचार नीती आहे. या देशांमध्ये संविधान बदलू पाहणाऱ्या आणि मनुवादी फॅसिझम आणू पाहणाऱ्या या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे आणि त्यासाठी देशाच्या तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई करणे आणि जिंकणे, ही जबाबदारी यासाठी स्थापन झालेल्या देशपातळीवरील इंडिया आघाडीने घेतलेली आहे. या आघाडीला सहकार्य करणे आणि त्याचबरोबर तिसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सहभागी होऊन मोदी आणि भाजपा सरकारला तडीपार करणे, हे देशातल्या सर्व लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष मतदारांचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी, देशातील विद्वेषवादी व तानाशाही सरकार बरखास्त करण्यासाठी आणि परिवर्तन घडवण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे आणि प्रदेश महासचिव, प्रदेश किसान संघटन प्रमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व दलितमित्र शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

समाजवादी पार्टीच्या वतीने या निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘लोकतंत्र बचाव” ही पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन सकाळी इचलकरंजी येथील कॉंग्रेस कमिटी मध्ये झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, राजीव आवळे, उल्हास पाटील, मदन कारंडे, शशांक बावचकर, सयाजीराव चव्हाण, संतोष चौगुले, सागर चाळके, कॉ. सदा मलाबादे, राहुल खंजीरे, विनय महाजन, राजू आलासे, प्रा ए बी पाटील, शिवाजी साळुंखे, जाविद मोमीन इ मान्यवर उपस्थित होते.

एकंदरीतच इ. स. 2014 पासून आजपर्यंत सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खते, किटकनाशके, शेती अवजारे, वीज, औषधे आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे वेगाने वाढलेली प्रचंड महागाई, रुपयाचे झालेले प्रचंड अवमूल्यन, देशावरील 10 वर्षांत चौपट झालेले 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज, म्हणजेच देशातील सर्व नागरिकांवर आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येकावर जन्मतःच प्रत्येकी अंदाजे दीड लाख रुपयाचे कर्ज, तरुणांच्या मधील प्रचंड वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुण पिढीत निर्माण झालेला असंतोष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित महिला अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार, जागतिक आनंदी राष्ट्र निर्देशांकात भारताची 111 व्या क्रमांकावरून 126 व्या क्रमांकावर झालेली घसरण, जागतिक भूक निर्देशांकात 55 क्रमांकावरून 111 क्रमांकावर गेलेला भारत, गेल्या दहा वर्षात भारतातील बड्या भांडवलदार धेंडांना दिलेली 16 लाख कोटी रुपये कर्जमाफी हीच मोदींना अपेक्षित असलेली विकसित भारताची गॅरंटी आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन या मागणीबाबत कोणताही निर्णय नाही. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाहून अधिक काळ झालेल्या आंदोलनामध्ये 750 हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले. नोटाबंदीमुळे गरिबांचे प्रचंड हाल झाले व रांगेत उभे राहून शेकडो गरीब नागरिक बळी पडले. कोविड काळात अचानक लादलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो किलोमीटर्स पायी प्रवासात शेकडो गरीब व कामगारांचे बळी गेले. हजारो मृत देह गंगेमध्ये फेकले गेले. पुलवामा प्रकरणी केवळ सरकारी हलगर्जीपणामुळे शहीद झालेले जवान आणि या जवानांच्या तरुण पत्नीना आलेले अकाली वैधव्य, शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड कोसळलेले शेतीमालाचे दर, शेतकऱ्यांचे सहन होणे शक्य नसलेले नुकसान आणि त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून झालेल्या आत्महत्या, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे फीही भरणे शक्य न झाल्यामुळे गरीब दलित आणि वंचित विद्यार्थ्यांची शिक्षणापासून झालेली फारकत, अशाप्रकारे सर्वच क्षेत्रांमधील अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी देशातील अनेक विरोधी पक्षीय नेते व प्रमुख यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स इत्यादी अनेक पद्धतीने झालेल्या धाडी आणि बेकायदेशीर रित्या अनेकांवर लादलेले तुरुंगवास, इलेक्टोरल बॉंडच्या माध्यमातून “चंदा दो धंदा लो” अशा पद्धतीने जमा केलेले कोट्यावधी रुपये, कारवाई थांबविण्यासाठी दहशतीच्या मार्गाने किमान 8252 कोटी रुपये हून अधिक रक्कम भाजपच्या खात्यामध्ये जमा, पी एम केअर्स फंडाचा कोणताही हिशेब नाही. या सर्व कारणांमुळे संविधान वाचवण्यासाठी आणि भाजपा सरकार पासून देशाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेशजी यादव यांनी देशपातळीवर इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश मध्ये 62 जागा लढवीत आहे आणि 17 जागा काँग्रेस लढवित आहे. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस नंतर सर्वाधिक जागा समाजवादी पार्टी लढवीत आहे. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार पार्टीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राज्यआघाडीत एकमताने निश्चित झालेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री शाहू छत्रपती आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामधील माजी सैनिक कल्याण समिती, जनता नागरी निवारा संघटना, आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार संघटना, धरणग्रस्त संघटना आणि विविध संबंधित संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी प्रचार कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये प्रताप होगाडे व शिवाजीराव परुळेकर यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेच्या वेळी समाजवादी पार्टीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रवी जाधव, इचलकरंजी शहर अध्यक्ष जाविद मोमीन, हातकणंगले तालुकाध्यक्ष मुकुंद माळी, जिल्हा उपाध्यक्ष चंदगडचे प्रा. एन एस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गारगोटीचे प्रा. प्रताप देसाई, राज्य कार्यकारीणी सदस्य श्रीमती उषा कांबळे, धरणग्रस्त संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, अनिल माने, रंगराव नारिंगकर, माजी सैनिक संघटनेचे श्री कांबळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी श्रीमती प्राजक्ता व वडील मेघन पंडित इत्यादी उपस्थित होते.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments