प्रतिनिधी : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि.२० एप्रिल २०२४ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती बृहन्मुंबई महानगरपालिका जी-उत्तर विभागामध्ये विविध चौकींमधून मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाली.
विर कोतवाल गार्डन, डॉ.आगाशे पथ, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, नारळीबाग,शितलादेवीज् कापडबाजार आणि मोटर लोडर दुपारपाळी आदी चौकींमधुन तेथील स्थानिक जयंती उत्सव समीतीने या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावर्षी प्रमुख पाहुणे तथा बाहेरच्या वक्त्यांना न बोलवता जी उत्तर विभाग मधील कार्यरत असणाऱ्या महीला पर्यवेक्षक यांनीच महापुरुषांच्या सामाजिक क्रांतीचा आदर्शवत इतिहास सांगून कामगारांमध्ये प्रबोधन करुन जनजागृती केली आहे.
विशेषतः सर्वं महीला अधिकारी यांनी हिंदू कोड बिल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय निवडून एकंदरीत बाबासाहेबांनी भारतातील पुरूष प्रधान संस्कृतीत महीलांना अग्रस्थानी कसे आणून ठेवले आहे आदी बाबतीत संबोधीत केले.महिलांसाठी नोकरीतील आरक्षण, आईवडील तसेच पतीच्या संपत्तीतील हक्क, विधवा महिलांसाठी पुनर्विवाह,दत्तक मुल घेणे,समान काम समान वेतन, बाळंतपणानंतर व बालसंगोपन इत्यादी हक्कांच्या रजा महीला कर्मचारी यांना मिळणेचा कायदेशीर हक्क, विधवा महिलांसाठी सरकारी विशेष सवलतीचा हक्क,महीला सशक्तीकरण इत्यादी आणि अशा अनेक कायदेशीर हक्कांबाबत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महामाता सावित्रीबाई फुले यांच्या लेकी बोलत्या झालेल्या पहायला, ऐकायला मिळाल्या.नुसत्या बोलत्या झाल्या नाहीत तर ड्रम सेट वाजवून डोलू लागल्या आणि नाचू लागल्या.आज सावित्रीच्या लेकी बोलताना ऐकणारे धन्य झाले. या वर्षी झालेल्या जयंतींचे आयोजन,नियोजन सावित्रीच्या लेकीने केलेलं पहावयास मिळाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खर्या अर्थाने आज जी/उत्तर विभागामध्ये झालेली पहावयास मिळाली.
या सावित्रीच्या लेकींमध्ये श्रीम.नीला सोलंकी,निर्मला विरास, सिध्दी टिबे,राधिका अहिरे,स्वाती नवले आणि स्वाती केदारे इत्यादीनी सहभाग घेतला होता.
