मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही असलेले, पण महायुतीत एकही जागा न मिळालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी दलित आणि अल्पसंख्याक समाजाला सोबत घेण्याची गरज असल्याचा सल्ला रिपाईंचे अध्यक्ष आठवलेंनी महायुतीला दिला. आम्ही विधानसभेसाठी ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत, असं आठवले म्हणाले.
राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. जागावाटपावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. शिंदेसेनेकडून १०० जागांची मागणी करण्यात येत आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८५ ते ९० जागा मागण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांना मागणीप्रमाणे जागा मिळाल्यास केवळ ९८ जागा शिल्लक राहतात. भाजपचे गेल्या निवडणुकीत १०५ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचा हट्ट भाजप पुरवण्याची शक्यता धूसर आहे. त्यातच आता आठवलेंनी ८ ते १० जागांवर दावा सांगितला आहे.
पुढील महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यात आम्ही १ जागा मागणार असल्याचं मंत्री आठवलेंनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आम्हाला एक मंत्रिपद मिळायला हवं. आमच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेला आम्ही शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघांसाठी आग्रही होतो. पण आमची मागणी मान्य झाली नाही. लोकसभेत एनडीए ४० जागा जिंकेल अशी आशा होती. पण केवळ १७ जागाच मिळाल्या, असं आठवले म्हणाले.
भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास संविधानात बदल करण्यात येईल, असा प्रचार विरोधकांनी केला. हाच प्रचार एनडीएच्या जागा कमी होण्यास कारणीभूत ठरला. महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये फारसं अंतर नसल्याचं आठवले म्हणाले. विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी दलित आणि अल्पसंख्याकांना महायुतीसोबत आणायला हवं. मी महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहे. आम्ही एकजुटीनं लढलो, तर विधानसभेची निवडणूक जिंकू, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.
