प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे धनदांडग्यांचे आहे गोरगरिबांचे नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पवईतील भीमनगरमध्ये राहणाऱ्या जवळपास ३०० झोपडपट्टीधारकांच्या घरांवर महानगरपालिकेने तोडक कारवाई करुन ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर केले आहे. 2000 च्या पूर्वीपासून या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांवर पात्रता निश्चित न करता, सर्वे न करता त्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही कारवाई अन्यायकारी असून नियम डावलून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी व या गरिब लोकांची पात्रता निश्चित करुन योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

एक जुन ते 30 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचे घर पाडू नये असे सर्क्युलर असतानाही बीएमसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या लोकांची घरे जमीनदोस्त केली. ३० मे रोजी या लोकांना बीएमसीने नोटीस पाठवली व सहा दिवसातच थेट कारवाई करण्यात आली. शेकडो लोकांचे संसार रस्त्यावर आले पण भाजपा सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. ह्या कारवाईला विरोध केल्यामुळे पोलिसांनी जवळपास ५० लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. गरिबांना बेघर करून त्यांच्यावरच पोलीसी कारवाई करणे हे तानाशाही सरकारचे काम आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अटक करण्यात आलेल्या लोकांना सोडून द्यावे व या लोकांचे पुनर्वसन करावे अशी काँग्रेसची मागणी आहे असेही राजहंस म्हणाले.
भीमनगर झोपडपट्टीतील या गरिब लोकांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे. सरकारकडे या प्रश्नी पाठपुरवा करुन न्याय देण्याचे काम करु. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू पण गरिबांना न्याय देण्याकामी तडजोड केली जाणार नाही. मुंबईतील गरिब कष्टकरी जनतेला मुंबईतून बेघर करण्याचा भाजपाचा डाव आहे हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत आला आहे आणि भीमनगर हे त्यातीलच एक उदाहरण आहे असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.