प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सहकारी त्रिस्तरीय पतसंरचने मार्फत वितरीत करण्यात येणारे पीक कर्जाचे रक्कमेची जे शेतकरी विहीत मुदतीत परतफेड करतात अशा शेतकरी सभासदांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाची रक्कमेचा लाभ दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 (अ) चा वापर करुन जे शेतकरी सभासद त्यांनी घेतलेले पीक कर्जाची परत मुदतीत करतात अशा शेतक-याकडून त्यांना अनुज्ञय असलेली प्रोत्साहनपर व्याज अनुदानाची रक्कम वजा करुन कर्जाची व व्याजाची परतफेड वसुल करणेत यावी म्हणून शासन क्रमांक- क्र.सी.सी. आर.1460/प्र.क्र. 215/2-स. दि.18/6/2021रोजच्या शासन निर्णयाने निर्णय घेतला होता. तोच आदेश शासनाने दिनांक 27 मार्च 2024 ला कायम ठेवला.
सदरील निर्णयाची अंमलबजावणी करणेसाठी सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सातारा जिल्हातील सर्व उप/सहाय्यक निबंधक व मुख्यकार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा यांना दि.२८.३.२०२४ रोजीचे पत्राने कळविले आहे. परंतू सातारा जिल्हा सहकारी बँक लि. सातारा या बँकेकडून सदरील प्रमाणे अमल बजावणी नं करता शासन निर्णयाचे उल्लंघन करत मुजोरपणा दाखवत व्याजवसुली चालूच ठेवली असल्याचे दिसून आले आहे. बँकेच्या कर्जाची वसूली होणसाठी बँक सोसायटी स्तरावर सर्व मुददल व व्याज वसूल करून घेण्याचा प्रकार चालूच ठेवला आहे.
श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था संस्थापक/अध्यक्ष श्री किशोर शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाचे आदेश नं पाळणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह महाराष्ट्र रात्यातील सर्व जिल्हा बँका, विकास सेवा सोसायट्या,इत्यादी वर ताबडतोब कारवाई घेण्याची व शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्याची मागणी केली आहे. दिनांक 16 मे 2024 रोजी सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सातारा जिल्हा बँकेवर कारवाईसह निर्देश देण्याकरता शासनास कळवले आहे.