Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रघाटकोपर दुर्घटना ; जाहिरात फलक हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरु....

घाटकोपर दुर्घटना ; जाहिरात फलक हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरु….


मुंबई : घाटकोपरमधील छेडानगर परिसरात  जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली. या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलक हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरु आहे. वाऱ्याच्या वेगामुळे हे होर्डिंग हटवण्याच्या कारवाईत बाधा येत आहे. असे असले तरी दोन जाहिरात फलक बुधवार रात्रीपर्यंत तर एक जाहिरात फलक गुरुवारपर्यंत हटवण्यात येईल असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

दरम्‍यान, मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे 40  फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्‍वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, या आशयाची नोटीस बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005अंतर्गत कलम 30 (2) (व्‍ही) अन्‍वये मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष या नात्‍याने अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावली आहे.

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काल भेट देवून पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेत बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील  अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासन कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
महानगरपालिका प्रशासनाने छेडा नगर परिसरातील आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचे आढळून आले. तीनही जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई मोहीम काल दिनांक 14 मे 2024 पासून हाती घेण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून ही कारवाई युद्ध पातळीवर सुरु आहे.

दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या कार्यात अडथळा न आणता या तीन फलकांच्या निष्कासन कारवाईला वेग दिला जात आहे. जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे सुटे करण्याचे आणि ते खाली उतरविण्याचे काम अविरत सुरु आहे. आज रात्रीपर्यंत दोन तर एक जाहिरात फलक उद्या निष्कासित करण्यात येतील. सुटे झालेले भाग आणि मलबा तात्काळ वाहून नेण्यात येत असून घटनास्थळ पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे प्रशासनाला नोटीस
घाटकोपर येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे प्रशासनाला आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 30 (2) (व्‍ही) अन्‍वये नोटीस बजावली आहे. मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने महानगरपालिकेने मध्‍य आणि पश्चिम रेल्‍वेचे विभागीय अभियंता यांना ही नोटीस पाठविली आहे. रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे 40 फूट बाय 40 फूटा पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक असल्‍यास ते तातडीने काढण्‍याचे निर्देश या नोटीसीद्वारे देण्‍यात आले आहेत. 

मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किना-याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही. असे असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महानगरपालिका रस्‍ते / खासगी जागा बांधकामे यांच्‍या लगतच्‍या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचे आढळून आले आहे. हे पाहता घाटकोपरमध्‍ये घडलेल्‍या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा ओढावू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीतील 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्‍याचे निर्देश मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष या नात्‍याने अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या स्‍वाक्षरीनिशी या नोटीसीतून देण्‍यात आले आहेत. 

मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला दुकानावरील अनधिकृत फलक निष्कासित
मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर 15 बाय 10 आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक काल (दिनांक 14 मे 2024) निष्कासित करण्यात आला. पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यामार्फत 1 निरिक्षक, 4 कामगार यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments