मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महायुतीचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला. सोमवारी दुपारी दिव्यांग बांधवांसह बच्चु कडू यांनी राहुल शेवाळे यांच्या सायन येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन हा पाठिंबा जाहीर केला. तसेच येत्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांच्या विजयासाठी दक्षिण मध्य मुंबईत काम करणार, असेही कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजकुमार पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
राहुल शेवाळे यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन आणि भविष्यातही त्यांच्याकडून या बांधवांसाठी अपेक्षित असलेल्या कार्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्तीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत” अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली. दक्षिण मध्य मुंबईत धारावी, सायन कोळीवाडा, अणुशक्ती नगर, चेंबूर याठिकाणी सुमारे 10 हजार दिव्यांग बांधव आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातील सुमारे 40 हजार नागरिकांचा पाठिंबा मिळणार आहे.
*कोट* –
आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मोठे कार्य केले आहे. मला देखील गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून या बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली. हा समान धागा घेऊन बच्चू कडू यांनी पाठिंबा जाहीर केला, ही माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. आम्ही दोघेही मिळून भविष्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी भरीव कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
– राहुल शेवाळे
