मुंबई : कोकण कम्युनिटी फोरम वर्ल्ड कोकणी डे यांच्या वतीने ‘कोकण मेळा सीझन ५०’चे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय मेळा शनिवार, १६ जानेवारी आणि रविवार, १७ जानेवारी २०२७ रोजी रिचर्डसन अँड कुडास ग्राउंड, भायखळा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणे हा या मेळ्याचा मुख्य उद्देश आहे. विविध धर्म आणि समाजांतील नागरिकांना एकत्र आणून बंधुभाव व सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
मेळ्यामध्ये पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम आणि व्यावसायिक प्रदर्शनांची रेलचेल असणार आहे. उद्योजक, महिला उद्योजिका, नवउद्योजक, कलाकार आणि स्थानिक विक्रेत्यांना आपल्या उत्पादनांचे व कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
शिक्षणाचा प्रसार, महिला सक्षमीकरण आणि युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. या मेळ्यात नागरिक, उद्योजक, स्टॉलधारक, प्रायोजक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




