ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा वेध घेणारे भव्य पुस्तक; ‘Gift of the Sahyadris चे प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्राच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा वेध घेणारे भव्य पुस्तक; ‘Gift of the Sahyadris’ची घोषणा
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि अस्मिता यांचा वेध घेणाऱ्या ‘Gift of the Sahyadris: The Story and Glory of Maharashtra’ या भव्य कॉफी टेबल बुकची हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. या संस्थेने प्रकाशन केले आहे. २८० पृष्ठांच्या या पुस्तकातून सातवाहन काळापासून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंतच्या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला आहे.
पुस्तकाच्या घोषणा समारंभाला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्ने प्रमुख अतिथी, तर ‘छावा’ चित्रपटाचे पटकथालेखक उन्मन बाणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हेरिटेज इंडियाच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. मंजिरी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पत्रकार व लेखिका कल्याणी सरदेसाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात सह्याद्रीचे भौगोलिक महत्त्व, बौद्ध लेणी, ऐतिहासिक किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, पेशवाई, समाजसुधारणा, शिक्षण, पत्रकारिता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास उलगडण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची भक्तिपरंपरा, मराठी भाषेचा विकास तसेच जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचे योगदानही पुस्तकात अधोरेखित केले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचाही यात समावेश आहे.
पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे. पुस्तकाची किंमत २,५०० रुपये असून, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हा महत्त्वपूर्ण ठेवा ठरणार आहे.

Scroll to Top