कराड : आटके, दुशेरे आणि घोगाव या तीन गावांचे ग्रामदैवत व ‘तिन्ही गावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री स्वयंभू बाळसिद्धनाथांची १९ वी श्रावणी यात्रा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ‘श्री बाळसिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी श्री बाळसिद्धनाथांचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. पूर्वी कौलारू असलेल्या मंदिराचा
श्री स्वयंभू बाळसिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर नव्याने भव्य स्वरूपात उभारण्यात आले. त्यानंतर झालेल्या कळसारोहण सोहळ्याच्या स्मरणार्थ मंदिराचा वर्धापन दिन ‘श्रावणी यात्रा’ म्हणून साजरा करण्याची परंपरा गेल्या १९ वर्षांपासून सुरू आहे.
श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जात असल्याने बाळसिद्धनाथांच्या मंदिरात संपूर्ण श्रावण महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज अभिषेक, पूजा-अर्चा तसेच सकाळी आणि सायंकाळी आरती करण्यात आली. नवसाला पावणारा देव म्हणून श्री बाळसिद्धनाथांची परिसरात मोठी श्रद्धा असल्याने यात्रेच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी व सायंकाळी विशेष आरती झाल्यानंतर महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. दिवसभर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तांच्या सेवेसाठी ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, आटके गावातून सलग दुसऱ्या वर्षी पायी दिंडी काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात ही दिंडी घोगाव येथील श्री बाळसिद्धनाथ मंदिरापर्यंत आणण्यात आली. घोगाव ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
यात्रेनिमित्त तीनही गावांतील ग्रामस्थ, भाविक, वारकरी आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धार्मिक वातावरण, ‘बाळसिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष, पायी दिंडी आणि महाभंडाऱ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शांततेत आणि उत्साहात १९ वी श्रावणी यात्रा संपन्न झाली.




