ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक संचाची अनमोल भेट

रेठरे बुद्रुक : येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मुले व मुली या शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे, या उद्देशाने पोपट शिवाजी कदम दादा सामाजिक कार्यकर्ते, अर्बन बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत शाळेला संगणक संच भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास चार्टर्ड अकाउंटंट उमेश मोहनराव मोहिते साहेब,अभिजीत सोमदे सर, रियाज आंबेकरी, रुपेश मोहिते, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना बनसोडे मॅडम, पाटील सर, देसाई सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी उमेश मोहिते साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षणातील महत्त्व समजावून सांगितले. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करून भविष्यातील संधींसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

संगणक संच मिळाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याची तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विविध विषय अधिक प्रभावीपणे शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही भेट केवळ संगणकाची नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली एक मौल्यवान संधी आहे.

मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी पोपट शिवाजी कदम दादा यांचे मनःपूर्वक आभार मानले.

गावकऱ्यांना मनापासून आवाहन

आपली शाळा, आपली जबाबदारी!

रेठरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक शैक्षणिक साधने आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, उद्योजक, अधिकारी, व्यापारी, शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या परीने शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला नवी दिशा मिळू शकते. संगणक, डिजिटल साधने, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, किंवा इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम आणि उज्ज्वल होईल.

शाळेच्या विकासासाठी एक पाऊल आपण उचलूया,
आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवूया!”

रेठरे बुद्रुकची शाळा आपल्या सर्वांची जबाबदारी, आपल्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हीच आपली सामूहिक बांधिलकी!

Scroll to Top