कराड : पोलिसांच्या कारवाईनंतर काही काळ थांबलेले कराड शहर व तालुक्यातील काही लॉजमधील कथित गैरप्रकार पुन्हा सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. प्रश्न एका लॉजचा नाही; अनेक लॉजच्या कारभारावरच संशयाची सुई आहे.
पोलिस कारवाई होते, गुन्हे दाखल होतात; मग काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू कसे होतात? कारवाईची माहिती आधीच लॉजचालकांपर्यंत पोहोचते का? त्यांना कोणाचे संरक्षण आहे?
काही लॉजमध्ये कथित वेश्याव्यवसाय, महिलांची संशयास्पद ये-जा आणि परराज्यांतून महिलांना आणल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची सत्यता तपासणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पवयीनांचा वापर होत असल्यास हा अत्यंत गंभीर गुन्हेगारी विषय आहे.
लॉजच्या नावावर कारवाई होते; पण पडद्यामागचा आर्थिक भागीदार आणि सूत्रधार कोण? मालक कोण, पार्टनर कोण, पैसा कोणाचा आणि प्रत्यक्ष कारभार कोणाचा—या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनंतर काही काळ अवैध व्यवसायांना आळा बसला. मात्र पुन्हा हे प्रकार सुरू होत असल्याच्या तक्रारी खऱ्या असतील, तर स्थानिक पातळीवर नेमके कुठे पाणी मुरतेय?
कराड शहर तसेच कराड व पाटण तालुक्यातील लॉज व्यवसायामागचे वास्तव काय?
गैरप्रकारांना संरक्षण कोणाचे?
आणि सर्वात महत्त्वाचे—पडद्यामागचा ‘मास्टरमाइंड’ कोण?
या प्रश्नांची उत्तरे आता केवळ कारवाईतून नव्हे, तर सखोल आणि निष्पक्ष चौकशीतून समोर येणे गरजेचे आहे.




