अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सरकार काम करत आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी, ता. राहाता येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ह.भ.प. रामगिरी महाराज, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, रमेश बोरनारे, विवेक कोल्हे, आशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह संत-महंत व हजारो भाविक उपस्थित होते.
गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या भूमीला नमन करत शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या वृद्धीसाठी १७९ वर्षांपूर्वी सुरू झालेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही भक्तिभावाने सुरू आहे. अखंड नामस्मरणामुळे परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले असून सहभागी प्रत्येक भाविक विठ्ठलस्वरूप आहे.
‘गावाची एकी तर देवाची कृपा नक्की,’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येत असल्याचे सांगत त्यांनी जातीभेद, श्रीमंत-गरीब भेद विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी एकत्र येणे ही संतपरंपरेची खरी ताकद असल्याचे नमूद केले. आठ ते दहा हजार वारकरी एकाच तालात १६८ तास भजन करतात, या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली असली तरी विठ्ठलाच्या भक्तीपुढे कोणताही जागतिक विक्रम छोटाच असल्याचे ते म्हणाले.
शिंदे यांनी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचा विश्वास देत त्यांनी बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्यापोटी पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
काकड आरती, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा, भगवद्गीतेचे पारायण, प्रवचन, हरिपाठ व कीर्तनातून समाजाचे प्रबोधन होत असल्याचे सांगत शिंदे यांनी ‘घ्यायचे असेल तर हरिनाम, द्यायचे असेल तर अन्नदान; जगायचे असेल तर नम्रता आणि बुडायचे असेल तर अहंकार’ हा संतांचा संदेश आजही मार्गदर्शक असल्याचे म्हटले.
संतपरंपरा, हिंदू संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत ‘हे सरकार सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, लाडक्या बहिणींचे, वारकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे,’ असे शिंदे म्हणाले. संत-महंतांच्या आशीर्वादातून सरकारला प्रेरणा मिळत असल्याचे सांगत त्यांनी रामगिरी महाराज व आयोजकांचे अभिनंदन केले आणि अखंड नामाचा गजर व पांडुरंगाचा आशीर्वाद कायम राहो, अशा शुभेच्छा दिल्या.




