मुंबई : आजची पत्रकारिता अतीशय बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. पत्रकारांनी स्वतः ची प्रकृती सांभाळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केवळ पत्रकारितेवर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे स्त्रोत शोधा, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार डॉ सुकृत खांडेकर यांनी पत्रकारांना सल्ला दिला. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे डॉ सुकृत खांडेकर यांच्या सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता आणि वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण अशा दुग्धशर्करा योगाबद्दल त्यांना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुकृत खांडेकर हे बोलत होते. मोठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यातील भलामोठा पगार घेणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चांगली असते परंतु बाकीच्या पत्रकारांना त्यांची आर्थिक परिस्थिती सांभाळणे, घर प्रपंच चालविणे कठीण होऊन बसते. त्यामुळे त्यांनी उत्पन्नाचे स्त्रोत शोधणे, जोड व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे, असे सुस्पष्ट शब्दांत सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ येथून आपली पत्रकारिता सुरु होऊन मुंबई, पुणे, दिल्ली अशा प्रकारे विविध जबाबदाऱ्या पूर्ण करतांना अजूनही विविध ठिकाणी लिखाण करीत असल्याचे आवर्जून सांगितले. ज्येष्ठ पत्रकार श्री राजीव खांडेकर, राही भिडे, योगेश वसंत त्रिवेदी, अभय देशपांडे, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने आदींनी डॉ सुकृत खांडेकर यांच्या कार्याचा गौरव केला. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी आभारप्रदर्शन केले. डॉ सुकृत खांडेकर यांचे अनेक जुने सहकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहिले होते.




