ताज्या बातम्या

टेम्पररी नंबर प्लेटवर विद्यार्थ्यांची वाहतूक? कराड दक्षिणेतील शालेय वाहनांबाबत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिण भागातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी काही वाहने अद्याप टेम्पररी (तात्पुरत्या) नंबर प्लेटवर धावत असल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक, वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC), तसेच शासनाने निर्धारित केलेली इतर सर्व आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक मानले जाते.
राज्य शासन व परिवहन विभागाकडून वेळोवेळी शालेय वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात असतात. अशा परिस्थितीत कराड दक्षिण भागात टेम्पररी नंबर प्लेटवर विद्यार्थी वाहतूक होत असल्याच्या चर्चेमुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याने शालेय वाहनांबाबत कोणतीही हलगर्जीपणा किंवा नियमभंग खपवून घेतला जाऊ नये, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top