कराड(प्रताप भणगे) : पर्यावरण अभ्यासक व समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला कराड तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी लाक्षणिक पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्यांना समर्थन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने एकत्र येऊन पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांचे जतन आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थितांनी केंद्र शासनाने सोनम वांगचूक यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने संवाद साधावा, अशी मागणी केली. तसेच हिमालयीन प्रदेशाचे पर्यावरणीय संवर्धन, स्थानिक नागरिकांचे हक्क आणि शाश्वत विकासाच्या प्रश्नांवर केंद्राने गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांचे उपोषण लवकरात लवकर सकारात्मक चर्चेतून आणि सर्वमान्य तोडग्याने संपुष्टात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही केले.




