ताज्या बातम्या

कर्तृत्वाचा दिमाखदार गौरव; ‘History Will Be Kinder’ पुस्तकाचे प्रकाशन आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई येथील नेरूळ सेक्टर १२ येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे केतकी प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जाधव यांच्या आयोजनातून पुस्तक प्रकाशन सोहळा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोजकेच पण प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते लेखक प्रथमेश मलईकर लिखित *”History Will Be Kinder”* या पुस्तकाचे प्रकाशन. या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण, परंतु समाजापुढे फारशा न आलेल्या पैलूंचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशा स्वरूपाचे हे पुस्तक असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जीवन गौरव पुरस्कार – श्री. विकास साठे – समाजाभिमुख कार्य, दीर्घकालीन योगदान आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल, साहित्य गौरव पुरस्कार – लेखक रमाकांत जाधव, मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या उल्लेखनीय लेखनासाठी,
लेखक गजानन म्हात्रे – समाजाभिमुख साहित्यनिर्मिती आणि वाङ्मयीन योगदानासाठी,
संपादक, पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप – पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार – श्री. अजित मगदूम व सौ. वृषाली मगदूम – समाजकार्य व आदर्श कौटुंबिक जीवनासाठी, श्री. प्रभाकर जेजूरकर व सौ. क्रांती जेजूरकर – समाजसेवा आणि प्रेरणादायी वैवाहिक जीवनासाठी देण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणजे समाजातील सकारात्मक कार्याला मिळालेली योग्य दाद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन केतकी प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जाधव यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. उपस्थितांनी पुरस्कारार्थींचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांचा ‘साहित्य गौरव पुरस्कार’ाने सन्मान
धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तथा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘साहित्य गौरव पुरस्कार’

प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षांपासून निर्भीड पत्रकारिता, समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top