सातारा: शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याचे रूपांतर अक्षरशः तळ्यात झाले असून वाहनधारक, पादचारी आणि सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते पाण्याखाली झाकले गेल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या महत्त्वाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी दुरवस्था असणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी तसेच खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.




