मुंबई : मुंबई महानगरपालिका ही भाजपा महायुतीसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून मुंबईकरांच्या हक्काच्या पैशावर सातत्याने दरोडा टाकला जात आहे. ९१ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर भाजपा महायुतीचा डोळा असून या मुदतठेवी मोडीत काढण्याचा सपाटा महायुतीने लावला आहे. मागील आर्थिक वर्षात ४ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी मोडून खर्च केल्या असून सर्व ९१ हजार कोटींच्या मुदतठेवी साफ करून बीएमसीला दिवाळखोर करण्याचा भाजपा महायुतीचा डाव आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, भाजपा सरकार हे लुटारुंचे सरकार आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यत जेथे संधी मिळेल तेथे दरोडा टाकण्याचे काम सुरु आहे. भाजपाने प्रभू रामालाही सोडले नाही, अयोध्येतील मंदिराच्या देणग्यांवरही दरोडा टाकला, ते मुंबई महापालिकेला काय सोडणार, असा प्रश्न करून आधीच मुंबई लाडक्या उद्योगपतीला मोफत दिली जात आहे, त्यात महानगरपालिकेच्या मुदतठेवींवर यांची वाकडी नजर गेली नसती तरच नवल. बीएमसीच्या मुदत ठेवी या काय चाटायच्या आहेत का, असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तेव्हाच त्यांचा हेतू स्पष्ट झाला होता. हा पैसा भाजपाचा पक्षनिधी नाही तर मुंबईकरांच्या हक्काचा आहे पण तोही मोडीत काढला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईकरांना चांगले रस्ते, मुबलक स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही, आरोग्य सुविधा मिळत नाहीत, बेस्ट विकून खाण्याचे षडयंत्र सुरु आहे. भाजपा महायुती ही केवळ लुटारूंची गँग आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.




