मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया तसेच जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे अनुयायी स्वर्गीय चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात १७ एप्रिल २०२६ पासून झाली असून हे शताब्दी वर्ष १७ एप्रिल २०२७ पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे.
स्व. चंद्रशेखर यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि संविधाननिष्ठ कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून “स्व. चंद्रशेखर शताब्दी समारोह जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य” स्थापन करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा, जयंती उत्सवाची तारीख आणि कार्यक्रमाचे स्थळ निश्चित करण्यासाठी समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल तसेच स्व. चंद्रशेखर यांच्या विचारांचे अनुयायी असलेल्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयाजवळील जनता दल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यभरातील समाजवादी विचारांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि संविधाननिष्ठ नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन स्व. चंद्रशेखर शताब्दी समारोह जयंती उत्सव समितीच्या समन्वयक प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.




