मुंबई(रमेश औताडे) : पुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन न्याय द्यावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन दिवसापुर्वी पुणे येथे पत्रकारांसमोर वार्तालाप करताना नारायणगाव-संगमनेर मार्गे जाणारा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा केली, तसेच शिर्डी, पुणतांबा, अहिल्यानगर मार्गे रेल्वेमार्ग प्रस्तावित करून कार्यवाही सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-संगमनेर मार्गे जाणारा मुळ मार्ग रद्द केल्याने या भागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.गेली अनेक वर्षे पुणे- नाशिक रेल्वे मार्ग झाल्यानंतर विकासाची कवाडे खुली होतील अशी सर्वांना आशा होती;सर्वेक्षण होऊन काही भुसंपादनही झाले,तोपर्यंत खोडद ता.जुन्नर येथील जीएमआरटी प्रकल्प रेल्वेमार्गासाठी अडथळा ठरत असल्याची बाब लक्षात का आली नाही ?असा प्रश्न टाव्हरे यांनी उपस्थित केला आहे.पुणे-चाकण औद्योगिक वसाहत-अहिल्यानगर-पुणतांबा-शिर्डी-नाशिक हा नवीन रेल्वे मार्ग केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे.पुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग सोयिस्कर असून तांत्रिक अडचणी दुर करून पुर्तता करणे आवश्यक आहे.प्रकल्प खर्च वाढला तरी भविष्यासाठी त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.
पुणे ते कल्याण मार्गे तसेच मनमाडमार्गे नाशिक हे रेल्वेमार्ग असताना नारायणगाव-संगमनेर मार्गे रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे. खेड,आंबेगाव,जुन्नर, संगमनेर या तालुक्यातील शेतकरी,उद्योजक यांना मालाची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरणार असताना अचानक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग रद्द करण्याची घोषणा केली आहे.




