मुंबई : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया बिल्डिंग राज्य सरकारने नुकतीच सुमारे १६०१ कोटी रुपयांत विकत घेतल्यानंतर या इमारतीत कार्यरत असलेल्या सुमारे ५० कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य बेरोजगारीच्या संकटामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
या पार्श्वभूमीवर शिवसेना सहकार सेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. जगदीश लाड यांनी संबंधित कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी श्री. लाड यांनी एअर इंडिया बिल्डिंगमधील कंत्राटी कामगारांना पूर्ववत रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे केली. कामगारांच्या व्यथा आणि अडचणी ऐकून घेत मंत्री भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.
मंत्र्यांच्या या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या रोजगाराबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर होण्यास मदत होणार आहे. याबद्दल श्री. जगदीश लाड यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले असून कामगारांच्या हितासाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




