सातारा(विजय जाधव ) : “भेसळ माफियांवर धडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली करण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रातील सरपंच आणि युवक रस्त्यावर उतरतील,” असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी शासनाला दिला आहे.
अवघ्या काही आठवड्यांत राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, अनधिकृत औषध व्यवसाय आणि बेकायदेशीर कारवायांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकून प्रशासनाला गती देणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कठोर कारवाईमुळे अनेक अवैध व्यवसायांवर आळा बसत असला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अधिकार, जबाबदारी, कर्तव्य पार अचंबित करणाऱ्या कारवाई केल्या आहेत. त्यांच्या प्रमाणेच अनेक अधिकारी महाराष्ट्र असून राजकीय दबाव आणि भ्रष्टाचारामुळे त्यांना काम करता येत नाही. यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरपंच परिषद यापुढे ठामपणे उभे असेल. प्रसंगी शासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलन आणि गाव बंद ठेवण्याचा सज्जड इशारा महिला राज्याध्यक्षा झीनत सय्यद यांनी दिला आहे.
सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी म्हटले की, “प्रामाणिक अधिकारी वारंवार बदल्यांचे बळी ठरतात, ही परंपरा थांबली पाहिजे. तुकाराम मुंढे यांना त्यांच्या पदाचा नियोजित कार्यकाळ पूर्ण करू द्यावा. अन्यथा राज्यभर ग्रामपातळीवर तीव्र आंदोलन उभे राहू शकते.”
परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह जाधव ( हणमंतवाडी ) यांनी ही शासनाला इशारा देत म्हटले की, “भेसळ माफियांविरोधातील कारवाई अर्धवट राहू नये. कोणत्याही दबावाखाली बदलीचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्रातील सरपंच शासनाविरोधात तीव्र भूमिका घेतील.”
चौकट :
एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही
“प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज उभा राहिला, तरच प्रशासनावरचा राजकीय दबाव कमी होईल. भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख व्यवस्था उभी करण्यासाठी युवकांनीही या लढ्यात सहभागी व्हावे. राजकीय दबाव मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था करण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. यामुळे प्रत्येक प्रामाणिक अधिकाऱ्याला एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही,हा सरपंच परिषदेने विश्वास दिला आहे. या लढ्यात आता युवा पिढीने सोबत यावे , ” असे आवाहन सरपंच परिषदेचे मार्गदर्शक आदर्श सरपंच शंकरबापू खापे ( बनवडी ) यांनी केले आहे.




