ताज्या बातम्या

वडापाव सम्राट अशोक ठाकूर यांचा जागतिक सन्मान…. मुंबईच्या ‘अशोक वडा पाव’ला TasteAtlas च्या जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस यादीत मानाचे स्थान

मुंबई : मुंबईची खाद्यसंस्कृती आणि ओळख बनलेला दादर येथील प्रसिद्ध ‘अशोक वडा पाव’ जागतिक स्तरावर झळकला आहे. दादरमधील किर्ती महाविद्यालयाजवळ गेली पाच दशके रसिकांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अशोक ठाकूर यांच्या ‘अशोक वडा पाव’ला नुकतेच TasteAtlas या आंतरराष्ट्रीय खाद्य मार्गदर्शक संस्थेच्या “World’s Most Iconic Sandwiches” यादीत २५वे स्थान मिळाले आहे. या यशामुळे केवळ अशोक ठाकूर नव्हे, तर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील वडापाव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१९६६ पासून दादरमध्ये सुरू असलेला हा स्टॉल आज मुंबईतील एक खाद्य-आयकॉन बनला आहे. विद्यार्थी, कामगार, प्रवासी, कलाकार, राजकारणी आणि देश-विदेशातील पर्यटक अशा सर्व स्तरांतील ग्राहकांनी या वडापावला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अलीकडेच प्रसिद्ध टेस्ला कारच्या जाहिरातीतही अशोक ठाकूर आणि त्यांचा प्रसिद्ध बटाटा वडा झळकल्याने त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.
वडापाव हा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीशी एकरूप झालेला खाद्यपदार्थ आहे. साधेपणा, परवडणारी किंमत, झटपट उपलब्धता आणि अप्रतिम चव यामुळे तो केवळ नाश्ता न राहता मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. या सांस्कृतिक प्रतीकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यात अशोक ठाकूर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
अवघ्या सतराव्या-अठराव्या वर्षी व्यवसायात उतरलेल्या अशोक ठाकूर यांनी आपल्या मेहनती, सातत्य आणि दर्जेदार चवीच्या जोरावर ‘अशोक वडा पाव’ला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. वयाची सत्तरी जवळ आली असतानाही त्यांचा उत्साह, ग्राहकांशी असलेला जिव्हाळा आणि कामावरील निष्ठा आजही तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
अशोक वडा पावची खासियत म्हणजे त्यासोबत दिली जाणारी अनोखी चटणी. या चवीमागे अशोक ठाकूर, त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांची अथक मेहनत दडलेली आहे. आईकडून मिळालेली प्रेरणा आणि गुणवत्तेप्रती असलेली बांधिलकी यामुळेच हा ब्रँड आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक Bryan Adams यांनीही वडापावला “सर्वात स्वादिष्ट व्हेगन स्ट्रीट फूड” अशी दाद दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‘अशोक वडा पाव’ची लोकप्रियता देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे.
मुंबई, ठाणे, कोकण, पालघर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असंख्य वडापाव विक्रेते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने ग्राहकांची मने जिंकत आहेत. अशा सर्व वडापाव कारागिरांसाठी ‘अशोक वडा पाव’चा हा सन्मान अभिमानाचा क्षण ठरला आहे.
मुंबईचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविणाऱ्या अशोक ठाकूर यांच्या कार्याची शासकीय स्तरावर दखल घेणे आवश्यक असल्याची भावना अनेक मुंबईकर व्यक्त करत आहेत. खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून शहराची ओळख जपणाऱ्या अशा उद्योजकांना प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांना आपल्या चवीने आणि आपुलकीने जोडणारे वडापाव सम्राट अशोक ठाकूर यांचे नाव आणि कार्य आगामी काळातही तितक्याच अभिमानाने स्मरणात राहील, यात शंका नाही. त्यांच्या या जागतिक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top