ताज्या बातम्या

जातींचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करा; अन्यथा महाराष्ट्रभर जनआक्रोश उसळेल — ईश्वर ताथवडे

धगधगती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू असलेल्या जातींच्या उपवर्गीकरणाच्या हालचालींवर संत रोहिदास नवपरिवर्तन सेना अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश सचिव ईश्वर विलासराव ताथवडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, सामाजिक न्याय आणि बंधुतेचा अधिकार दिला. मात्र, जातींच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आजचे सरकार त्या संविधानिक समतेलाच तडा देण्याचे काम करत आहे. हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून समाजात जाणीवपूर्वक दुभंगता निर्माण करून उच्च-नीचतेची भिंत उभी करण्याचा धोकादायक प्रयत्न आहे,” असा आरोप ताथवडे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, समता, न्याय आणि बंधुतेच्या संविधानिक मूल्यांवर घाला घालून सरकार सामाजिक संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न करत आहे. मागासवर्गीय समाजात कृत्रिम फूट पाडून काहींच्या राजकीय स्वार्थासाठी संविधानाशी गद्दारी केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“जर सरकारने हा संविधानविरोधी निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर महाराष्ट्रातील सकल मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभे करेल. जिल्हा ते मंत्रालय स्तरापर्यंत मोर्चे, धरणे, रास्तारोको आणि लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. संविधानाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने सामाजिक समतेशी खेळ करणे तात्काळ थांबवावे, अन्यथा निर्माण होणाऱ्या असंतोषाची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असेही ताथवडे यांनी स्पष्ट केले.
“संविधानावर घाला घालणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही;
समतेच्या रक्षणासाठी संघर्ष आता निर्णायक टप्प्यात!”

Scroll to Top