ताज्या बातम्या

विकासाच्या मुद्द्यावरच ‘कृष्णा’ची निवडणूक लढवणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले

कराड (वार्ताहर) : “यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा आणि आदर्श कारखाना आहे. गेल्या अकरा वर्षांत कारखान्याने उच्चांकी गाळप, उच्चांकी दर आणि सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत,” असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत कारखान्याच्या कामकाजाची माहिती दिली.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, “१९५५ साली कारखान्याची स्थापना झाली. १९५९ मध्ये चाचणी गाळप हंगाम पार पडला, तर १९६० मध्ये पहिला नियमित गाळप हंगाम झाला. सुरुवातीला ८०० टन गाळप क्षमतेचा असलेला हा कारखाना आज १२ हजार टन गाळप क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. ७२०० टनांवरून १२ हजार टन क्षमतेपर्यंतचा प्रवास मागील अकरा वर्षांत आदरणीय सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला.”
“महाराष्ट्रात उच्चांकी ऊसदर देतानाच सभासदांना वर्षाला ६० किलो मोफत साखर देणारा कृष्णा हा एकमेव कारखाना आहे. मोफत साखर घरपोच देण्याचा निर्णयही सभासदांच्या हितासाठीच घेतला. त्यामुळे शेतकरी सभासदांना मोठा फायदा झाला,” असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “यंदाच्या गाळप हंगामात कृष्णा कारखान्याने १४ लाख १९ हजार टन ऊस गाळप केले असून, सहकारी क्षेत्रात राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे गाळप करण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे सभासदांचा व्यवस्थापनावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
कारखान्याच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “सहकाराच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण आणू नये, हीच आपल्या पूर्वसूरींची भूमिका होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले आणि राजारामबापू पाटील यांनी सहकार क्षेत्रात हीच विचारधारा रुजवली. सहकारी संस्था ही सभासदांची असते. त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता सभासदांचे हित जपणे हेच आमचे धोरण राहिले आहे.”
प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. आम्ही सभासदांपर्यंत जाऊन कारखान्याने केलेले काम पोहोचवणार आहोत. विरोधात कोण आहे, यापेक्षा सभासदांचा विश्वास आणि विकासाचे काम हेच आमचे खरे बळ आहे,” असा विश्वासही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.

….. तर त्यांचे स्वागतच आहे – आ. डॉ. भोसले

भोसले गटाबरोबर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या राजकीय समीकरणांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “सध्या आमच्यासमोर फक्त कृष्णा कारखान्याची निवडणूक आहे. भविष्यातील इतर निवडणुकांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मात्र समन्वयातून राजकारण व्हावे, अशी सर्वांची इच्छा असेल तर त्याचे स्वागतच आहे.”

सहकार पॅनेल मध्ये जुन्या-नव्या चेहऱ्यांचा समन्वय दिसेल…

“कारखाना चांगल्या पद्धतीने चालत असल्याने सर्वच तालुक्यांतून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. काही जुने आणि काही नवीन चेहरे घेऊन संमिश्र पॅनल उभे राहील. स्थानिक परिस्थिती आणि सभासदांच्या भावना लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल,” असेही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले.

Scroll to Top