मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी आजही समाजातील काही घटक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करताना दिसतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा वाशीळी परिसरातील कातकरी समाजातील मंजुळी काशिनाथ सावंत यांची जीवनकहाणी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
टोकरखान परिसरात राहणाऱ्या मंजुळी सावंत यांच्या पतीचे दारूच्या व्यसनामुळे निधन झाले. संसाराची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्या खांद्यावर आली. दोन मुले आणि एका मुलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या रोज डोंगर-दऱ्यांत जीव धोक्यात घालून करवंदे गोळा करतात. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगा पाचवीतून शिक्षण सोडून आपल्या आईला मदत करत असतो.

तर दुसरा अजून लहान आहे.
दिवसभर प्रखर उन्हात, वन्य प्राण्यांच्या भीतीत आणि काटेरी झुडपांमध्ये फिरत करवंदे गोळा करणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे. करवंदे काढताना अंगभर काटे टोचतात, अनेक त्रास सहन करावे लागतात. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या हे सर्व सहन करत आहेत.
शहापूर-कसारा येथून मुंबईत येऊन त्या भायखळा स्टेशनबाहेर करवंदे विकतात. एका पुडीसाठी त्या अवघे २० रुपये घेतात. मात्र अनेकदा ग्राहक त्यातही घासाघीस करत १० रुपयांत मागणी करतात. ज्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, त्याचप्रमाणे या रानमेव्यालाही योग्य किंमत मिळत नसल्याचे वास्तव दिसून येते.
योगायोगाने मंजुळी मावशींकडून करवंदे खरेदी करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती जाणून घेतली. त्यांच्याकडून दहा पुड्या करवंदे घेत दोनशे रुपये दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि हास्य मनाला स्पर्शून गेले.
त्यांच्या शेजारी नुकतेच लग्न झालेली एक तरुणी जांभळे विकत बसली होती. अशा अनेक कातकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह या रानमेव्यावर चालतो. मुंबईकरांनी हॉटेलमध्ये खर्च करण्यापेक्षा अशा गरीब विक्रेत्यांकडून रानमेवा खरेदी केला, तर त्यांना आर्थिक आधार मिळू शकतो आणि आपल्यालाही निसर्गाचा अस्सल स्वाद अनुभवता येऊ शकतो.
आजही समाजातील काही घटक शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मंजुळी सावंत यांचा संघर्ष हा ग्रामीण आणि आदिवासी भागातील वास्तव अधोरेखित करणारा असून, शासन आणि समाजाने अशा कुटुंबांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे यातून स्पष्ट होते.




