प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रहार संघटनेतील काही नाराज कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना, “घरी बोलवून त्यांना मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत,” असे वक्तव्य केले होते.
या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, “उद्धव साहेबांकडून मला ही अपेक्षा नव्हती. आम्ही शिवसेनेविरोधात निवडणूक लढवून विजयी झालो होतो. निवडणुकीनंतर सर्व पक्षांकडून आम्हाला निमंत्रण होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत उद्धव साहेबांसोबत आमची भेट घडवून आणली. त्यावेळी आम्हाला वाटलं की, उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे.”
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं, “आम्ही घरी येऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. त्यावेळी आम्ही सात अपक्ष आमदार तुमच्यासोबत ठामपणे उभे राहिलो. पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलं नाही, तर आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे लक्षात घ्या.”
तसेच, “हा विषय मला बोलायचा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदर आहे. मात्र त्यांनी हा विषय काढल्यानंतर लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मला भूमिका स्पष्ट करावी लागली,” असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.



