ताज्या बातम्या

दिल्लीत लाठीचार्ज – महाराष्ट्र पोलिसांचे डिजिटल पेट्रोलिंग; राज्यभरातील ९८ आंदोलनांवर विशेष नजर

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतही आंदोलनाची धग पोहोचली आहे. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि तरुणाई आंदोलनाला समर्थन देताना दिसत आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संतापाची लाट उसळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर विशेष डिजिटल पेट्रोलिंग आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी व्यापक नियोजन केले.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य आंदोलनांची दखल घेत तब्बल १४ दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेष नजर ठेवण्यात आली. आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग, कीवर्ड्स, सातत्याने पोस्ट करणारी खाती आणि ऑनलाइन हालचालींचे विश्लेषण करून संभाव्य आंदोलनस्थळे व आयोजकांची माहिती संकलित करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी तिन्ही स्तरांवर रणनीती राबवली. प्रथम सोशल मीडिया मॉनिटरिंगद्वारे गुप्त माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकासह प्रमुख प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवून काही प्रमुख व्यक्तींना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रांकडे जाणाऱ्यांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांत हलविण्यात आले, जेणेकरून मोठा जमाव जमा होऊ नये.
मुंबईतील शिवाजी पार्क, कोल्हापूरचा शिवाजी चौक, पुणे, गडचिरोलीसह राज्यातील एकूण ९८ ठिकाणी आंदोलने झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या मते, डिजिटल मॉनिटरिंग, गुप्त माहितीचा प्रभावी समन्वय आणि वेळेवर केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहिली असून कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही.

Scroll to Top