जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील पत्रकार चंद्रकांत सुदाम औटी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुभाष डोके तसेच जुन्नर तालुका अध्यक्ष नयन डुंबरे यांनी आवटी यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार औटी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सहकार चळवळीद्वारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम केले. आपल्या प्रभावी लिखाणातून त्यांनी समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि लोकहिताचे कार्य केले.
तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने औटी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व किराणा साहित्य देऊन आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आपल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबाच्या पाठीशी कायम उभा आहे. परिवारावर कोणतीही अडचण किंवा प्रश्न निर्माण झाल्यास पत्रकार संघ नेहमी मदतीसाठी तत्पर राहील.”
या भेटीद्वारे पत्रकार बांधवांमधील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकार कुटुंबाप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.




