ताज्या बातम्या

राज्यात शेतकरी कर्जमाफीला वेग; पहिल्या टप्प्यात ५३२ लाभार्थ्यांची यादी जाहीर

मुंबई : राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ५३२ पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, २ जून २०२६ रोजी मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती, तर १५ जुलैच्या शासन निर्णयानुसार काही निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली. महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार असून, ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थी याद्या प्रसिद्ध केल्या जातील. आधार प्रमाणीकरणानंतर डीबीटीद्वारे कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा केली जाईल. यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणे आवश्यक असून, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Scroll to Top