
सातारा(प्रताप भणगे) : सातारा तालुक्यातील ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मुदत संपलेली (Expired) सलाईन लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. समर्थ मावळा प्रतिष्ठान (पठार विभाग) बोरणे-ठोसेघर यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, दि. १८ मे २०२६ रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांना एक्सपायरी डेट झालेल्या सलाईन बॉटल लावण्यात आल्या. यामध्ये अमोल तात्यबा मोहिते (जिमनवाडी), हौसाबाई चाळके (चाळकेवाडी) तसेच पूनम संजय चव्हाण (ठोसेघर) या रुग्णांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित सलाईनच्या उत्पादन व मुदत समाप्ती तारखांवरून त्या वापरण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
गरिबांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रात असा निष्काळजीपणा होणे अत्यंत गंभीर असून, यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट व स्टोअर कीपर यांच्यावर तात्काळ प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आरोग्य केंद्रातील औषधसाठ्याची तपासणी करून इतर मुदतबाह्य औषधे आहेत का याची चौकशी करावी व भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही याची लेखी हमी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबत सलाईन बॉटलचे फोटो व व्हिडिओ पुरावे जोडण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष खेत्रू धोंडीबा चाळके यांनी दिली.




