प्रतिनिधी : भारत आणि आफ्रिका यांच्यातील आर्थिक व व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंडिया एक्झिम बँकेने आफ्रिका फायनान्स कॉर्पोरेशन (AFC) ला १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कर्जसुविधा मंजूर केली आहे. भारत सरकारच्या “फोकस आफ्रिका” उपक्रमांतर्गत आफ्रिका खंडातील भारतीय प्रकल्प निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध अधिक व्यापक आणि मजबूत झाले असून व्यापार, पायाभूत सुविधा, क्षमता विकास तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत-आफ्रिका व्यापार तब्बल ८१.९० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला. यामध्ये भारताच्या निर्यातीचा वाटा ४२.७० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका नोंदवण्यात आला आहे.
इंडिया एक्झिम बँकेकडून AFC ला दिली जाणारी ही कर्जसुविधा यापूर्वीच्या आर्थिक सहाय्याचा पुढील टप्पा मानला जात आहे. कोविड-१९ महामारीनंतर आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये AFC ला १०० दशलक्ष डॉलर्सची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये भारताच्या प्रकल्प निर्यातीस समर्थन देण्यासाठी आणखी १०० दशलक्ष डॉलर्सची कर्जसुविधा मंजूर करण्यात आली होती.
आफ्रिका फायनान्स कॉर्पोरेशन (AFC) ही आफ्रिकेतील पायाभूत सुविधा गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारी पॅन-आफ्रिकन बहुपक्षीय वित्तीय संस्था असून, संस्थेमध्ये ४८ सार्वभौम सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.
या नव्या कर्जसुविधेमुळे आफ्रिकेतील भारतीय कंपन्यांच्या प्रकल्पांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, भारत-आफ्रिका आर्थिक भागीदारी आणखी मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.



