सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा म्हणजे खऱ्या अर्थाने सप्ततारा आहे. याच सातारा जिल्ह्यात माथाडी कामगारांच्या न्यायासाठी झटणारे माथाडी कामगार नेते त्यांच्या जिल्ह्यात सध्या वेतन विना शासकीय गुदामातील माथाडी कामगार काम करत आहेत. उपाशीपोटी धान्य पोत्याची चढ-उतार करणाऱ्या माथाडी कामगारांची भूक भागवण्यासाठी वेतन केव्हा मिळणार? असा प्रश्न आता काही माथाडी कामगार विचारू लागले आहेत. दरम्यान जून अखेर पर्यंत माथाडी कामगारांना पैसे मिळाले नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाच्या वतीने माथाडी कामगारांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सातारा जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये अन्नपुरवठा विभागामार्फत होणाऱ्या अन्न वितरणाच्या विविध
शासकीय गोदामातील माथाडी
कामगारांना गेल्या चार महिन्यात
वेतन मिळाले नाही . सातारा जिल्ह्यात दोन खासदार ,चार मंत्री, चार आमदार हे महायुतीचे आहेत. डझनभर माथाडी कामगार संघटना आहे. सत्ता बदलतात सत्ताधारी पक्षासोबत राहणे म्हणजेच आपले समाजकारण व राजकारण आहे असे काही माथाडी नेते समजतात. त्याला काहीजण अपवाद असले तरी त्यांचा आवाज शासन दरबारी दाबला जात आहे. त्याची आर्थिक झळ सध्या माथाडी कामगार सहन करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील शासकीय
गोदामातील माथाडी कामगार विविध कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत .सातारा माथाडी
असंरक्षित कामगार मंडळाकडे नोंदित कामगारांचे वेतन वीस हजार रुपयांपर्यंत आहे. जानेवारी महिन्यापासून काहींना दरमहा वेतन मिळाले नाही. हात उसने व कर्ज काढून सध्या त्यांचा संसार सुरू आहे. त्यांची आता आर्थिक मर्यादा संपत चालली असून याबाबत सातारा जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात काही संघटनेने प्रश्न मांडले आहेत. आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार अधिनियमन १९६९ मधील तरतुदीनुसार नोंदित मालकाने
प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत
कामगारांची मजुरी व लेवी यांचा भरणा
माथाडी मंडळाकडे भरणा करण्याची तरतूद आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये याचा समावेश आहे . शासकीय गुदामातून अन्नधान्य पोत्याची चढ उतार करण्यास माथाडी कामगारांनी नकार दिला तर लोक रस्त्यावर येतील? आंदोलन होईल? याला जबाबदार शासन असेल. असतानाही माथाडी कामगारांचे वेतन देण्यास अडचणी येत आहेत हे भूषणावह नाही. याबाबत सातारा जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना काही संघटनेने लेखी पत्र दिले. त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे कारण या विभागातील शासकीय कामगारांना वेळेत पगार जमा होतो. त्यामुळे त्यांना वेतनाबाबतची झळ पोहचत नाही. की झळ पोचू नये अशीच माथाडी कामगारांची इच्छा आहे. त्याचा तरी त्यांनी विचार करावा अशी अपेक्षा माथाडी कामगारांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुरस्कारही दिले होते. मग , शासकीय गुदामातील माथाडी कामगार १२० दिवस झाले तरी वेतन मिळाले नाही. त्याबाबत कोणाची चौकशी करणार ? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाने आंदोलनासाठी आता माथाडी बांधवांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री खंकाळ यांनी दिली आहे. त्यावेळेला सोमनाथ धोत्रे, संतोष नलावडे, राजेंद्र ओव्हाळ व अडागळे उपस्थित होते.
_________________________________
फोटो– शासकीय गुदामातील माथाडी कामगारांचा प्रतीकात्मक फोटो




