
मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांतून महाराष्ट्राच्या डिजिटल अर्थव्यवस्था आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या धोरणांची दिशा स्पष्ट केली. ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६च्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘इंडिया रायझिंग : रोड टू ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६’ कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राला देशाचे डिजिटल क्रिएटिव्ह हब बनविण्याचा निर्धार व्यक्त केला, तर आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त झालेल्या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात सहकार चळवळीचे ग्रामीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’मुळे देशातील युवा गेमर्सना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे. राज्याने एव्हीजीसी-एक्सआर धोरणासाठी ३,२६८ कोटी रुपयांची तरतूद केली असून ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दोन लाख रोजगारांचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यभरात १२ एव्हीजीसी पार्क उभारले जाणार असून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
याच दिवशी झालेल्या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात फडणवीस यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळाल्याचे सांगितले. महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज, विकास आणि आर्थिक संधी पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही प्रभावी कामगिरी केल्याचे सांगत स्वयं पुनर्विकास योजनेमुळे मुंबईतील मराठी कुटुंबांचे मोठ्या घराचे स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी’, आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण’ यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सहकार गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री यांनी राज्य सरकार गेमिंग, डिजिटल कंटेंट आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांना सर्वतोपरी पाठबळ देत महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.




