ताज्या बातम्या

लोकलमध्ये १५ तास बेशुद्ध रुग्ण; रेल्वे यंत्रणेच्या चौकशीची मागणी

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये तब्बल १५ तास बेशुद्ध अवस्थेत पडून असलेल्या जेष्ठ पत्रकाराच्या प्रकरणामुळे रेल्वे प्रशासन व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकांचे दोस्तच्या वतीने करण्यात आली आहे.
जेष्ठ पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय ६०) हे १५ एप्रिल रोजी दुपारी सायन स्थानकावरून लोकलने प्रवास करत असताना बेशुद्ध पडले. मात्र, ते दुसऱ्या दिवशी सकाळी टिटवाळा येथून यार्डमधून आलेल्या लोकलमध्ये आढळून येईपर्यंत रेल्वे प्रशासनाला याची माहितीच नव्हती. प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकावर उतरवून खासगी क्लिनिकमध्ये दाखल केले.
कुटुंबीयांनी त्यांना पुढे Holy Cross Hospital येथे हलविले, जिथे आयसीयूमध्ये दोन दिवस उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. दरम्यान, पोलिसांनी रुग्णाशी उर्मट वर्तन केल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर रवि भिलाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बेशुद्ध प्रवासी १५ तास गाडीत कसा राहिला, यार्डमध्ये जाण्यापूर्वी तपासणी का झाली नाही, तसेच गंभीर रुग्णाला योग्य रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, संबंधित पोलिसांवर कारवाई करून रुग्णास नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Scroll to Top