ताज्या बातम्या

मुंबईत २४ तासांत तीन हत्या; कायद्याचा धाक उरला का? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत रविवारी अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हत्या झाल्याने शहर हादरून गेले आहे. दादर, माटुंगा आणि वांद्रे (खेरवाडी) परिसरात घडलेल्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ वाद, पार्किंगचा प्रश्न आणि पूर्ववैमनस्य अशा कारणांमुळे या हत्या घडल्याचे समोर आले आहे.
दादरमध्ये पत्नीसमोर तरुणाची हत्या
दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून अंकुश आंबेकर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी अंकुश आपल्या पत्नीसोबत मित्राला भेटण्यासाठी जात असताना आरोपींनी नागू सयाजी वाडी येथे त्यांची वाट अडवली. गौरव सनस आणि त्याच्या साथीदारांनी अंकुशवर बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे.
माटुंग्यात पार्किंग वादातून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
माटुंगा येथे पार्किंगच्या वादातून नरेश वाघेला या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. दादर टाटा ब्रिजखाली वाहन उभी करू नये असे सांगितल्यावरून वाघेला आणि आरोपींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यात वाघेला गंभीर जखमी झाले. त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
खेरवाडीत धारदार शस्त्राने हत्या
वांद्रेतील खेरवाडी परिसरात अभिनव चौधरी यांची दोन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हत्या केली. जुन्या शाब्दिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींनी भररस्त्यात हल्ला करून पळ काढला. खेरवाडी पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
मुंबईत भीतीचे सावट
एकाच दिवशी घडलेल्या या तीन हत्यांनी मुंबईकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना वैयक्तिक वादातून घडल्या असून कुठलाही मोठा गुन्हेगारी कट किंवा टोळीयुद्धाचा संबंध नाही. भररस्त्यात, लोकांच्या उपस्थितीत आणि कुटुंबासमोर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने “गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई पोलिसांनी सर्व घटनांमध्ये वेगाने कारवाई सुरू केली असली तरी वाढत्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top