कराड(अमोल पाटील) : कराड तालुक्यातील जिंती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जय हनुमान तालीम जिंती या तालीम वास्तूची वास्तुशांती व होमहवन विधीचा भव्य सोहळा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालीम बांधकामासाठी मा. उदयसिंह विलासराव पाटील (दादा), जि.प. सदस्य सातारा तसेच चेअरमन, रयत सहकारी साखर कारखाना यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. तसेच लाल माती व आखाडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मोलाचे सहकार्य केले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे ही तालीम वास्तू साकार झाली असून गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
वास्तुशांती व होमहवन विधीनंतर मान्यवरांच्या हस्ते तालीम लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात धार्मिक विधी पार पडणार असून परिसरातील पैलवान, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण अंगणवाडी शाळा, जिंती (ता. कराड, जि. सातारा) येथे निश्चित करण्यात आले आहे. या शुभप्रसंगी जिंती ग्रामस्थ, पैलवान बंधू, विविध संस्था-मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पैलवान ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ जिंतीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जय हनुमान तालीम ही जिंती गावातील युवकांसाठी क्रीडा, शिस्त आणि संस्कारांचे केंद्र ठरणार असून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पैलवान घडवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.




