मुंबई, दि. २ : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील तसेच कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदार कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश खासगी कंपन्या, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स व रिटेलर्स यांना लागू राहणार आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत अत्यावश्यक किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी शक्य नसेल, तर कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आस्थापना मालकांना बंधनकारक असेल.
या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.



