ताज्या बातम्या

‘पद्य’ सन्मान : मातीतल्या कलेचा आणि आईच्या पुण्याईचा…

विशेष लेख : ज्येष्ठ तमाशा सम्राट, कला-भूषण मास्टर रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आणि महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात एक सुवर्णाक्षर कोरलं गेलं. ही केवळ एका कलाकाराची गौरवगाथा नाही, तर तमाशासारख्या रांगड्या, मातीतल्या कलेला मिळालेला राष्ट्रीय सलाम आहे.
मात्र या आनंदाच्या शिखरावर उभं राहताना एका नावाची उणीव प्रकर्षाने जाणवते—
तमाशा सम्राज्ञी, कांताबाई सातारकर…!

पद्म सन्मान : मातीचा आणि आईच्या पुण्याईचा…

आज रघुवीर खेडकर या नावापुढे ‘पद्मश्री’ ही मानाची मोहोर उमटली आहे. ढोलकीचा कडकडाट तोच आहे, घुंगरांचा नादही तोच आहे; पण या आनंदाच्या जल्लोषात नजर मात्र वारंवार रंगमंचाच्या एका कोपऱ्यात जाऊन थांबते—
त्या आऊसाठी…
जिनं लेकाला रंगमंचावर चालायला शिकवलं, कलेशी नातं जोडायला शिकवलं आणि जगासमोर ताठ मानेनं उभं राहण्याचं बळ दिलं.

आई असती तर…!

आज जर कांताबाई सातारकर हयात असत्या, तर त्यांच्या आनंदाला खरंच पारावार उरला नसता. डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू, भरून आलेलं मन आणि अभिमानानं फुललेलं काळीज—
“माझ्या रघूनं आज खेडकर घराण्याचं आणि तमाशाचं नाव थेट दिल्लीच्या दरबारात नेलं,”
हे शब्द त्यांच्या ओठांवर थरथरले असते.
ज्या कलेसाठी त्यांनी आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्या, समाजाची उपेक्षा झेलली, ज्या घुंगरांच्या आवाजासाठी अनेकदा अपमानाचे चटके सोसले—
त्या कलेला आज देशातील सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.
आईची ती मायाळू, पण करारी नजर आज प्रत्यक्ष नसली तरी, तिचं आशीर्वादरूपी अस्तित्व आजही रघुवीर खेडकरांच्या पाठीशी उभं आहे, याबद्दल शंका नाही.

संघर्षाचं फळ…!

तमाशा कलेला नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. मात्र कांताबाईंनी याच मातीत उभं राहून संस्कृती जपली.
रघुवीर खेडकर यांनी आईचा हा वारसा केवळ पुढे नेला नाही, तर तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.
आजचा ‘पद्मश्री’ पुरस्कार म्हणजे केवळ एका कलाकाराचा सन्मान नाही—
तो आईनं आयुष्यभर केलेल्या संघर्षाची, त्यागाची आणि न झुकणाऱ्या श्रद्धेची पावती आहे.
“आई, तू दिलेली ढोलकीची थाप, पहाडी गळ्याचा आवाज आणि पायातले ते घुंगरू आज जगाला सांगतायत—
कलेला सीमा नसते, आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत.”
एक अधुरी राहिलेली भेट…
हा सन्मान स्वीकारताना रघुवीर खेडकर यांची नजर एकदा तरी आभाळाकडे वळलीच असेल.
तिथे कुठेतरी, ताऱ्यांमध्ये चमकणारी कांताबाई हसत म्हणत असतील—
“रघू, जिंकलंस लेका…! मी नसले तरी काय झालं, आईची माया देणाऱ्या तुझ्या बहिणी खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहेत. भिऊ नकोस बाळा…”
खऱ्या अर्थानं हा पुरस्कार त्या माउलीच्या चरणी समर्पित झाला आहे,
जिनं तमाशाच्या रांगड्या मातीतून सुवर्णस्वप्न पाहिलं होतं.
आईच्या संस्कारांची सावली…
लेकाच्या डोळ्यांतला आनंद, चेहऱ्यावरचा थकवा आणि मनात दाटलेला अभिमान—
हे सगळं आज कांताबाईंनी आपल्या मायेच्या पदरात सामावून घेतलं असतं.
पडद्यामागील कष्ट, अपमान, उपेक्षा, प्रवासाची धूळ आणि रंगमंचावरील प्रकाश—
या संपूर्ण वाटचालीवर आईच्या आशीर्वादाचं छत्र सदैव डोक्यावर राहिलं.
आज पुरस्काराच्या घोषणेत जे नाव उमटलं, त्या नावामागे आईच्या संस्कारांची सावली होती—हे विसरता येणार नाही.
तमाशासारख्या लोककलेत टिकून राहणं सोपं नसतं. समाजाची नजर, आर्थिक ओढाताण आणि अनिश्चित भविष्य—या सगळ्यांशी झुंज देताना आईचं बळच आधार ठरतं.
“माझा लेक मोठा होईल,” ही शांत, पण ठाम श्रद्धा कांताबाईंनी आयुष्यभर जपली.
आज त्या नसल्या तरी, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या मायेचा, त्यागाचा आणि आशीर्वादाचा सर्वोच्च सन्मान आहे.
हा आनंद मोठा आहे, पण या आनंदात कुटुंबियांच्या डोळ्यांत पाणीही असेल.
कारण काही आनंद असे असतात—
जे आईसमोरच साजरे व्हायला हवेत…
या सन्मानाच्या प्रत्येक क्षणात आईची आठवण, तिच्या आशीर्वादाचा स्पर्श खेडकर कुटुंबाला जाणवत राहील—हे मात्र निश्चित.

✍️ खंडूराज गायकवाड
khandurajgkwd@gmail.com

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top